बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

'द लिव्ह वेल डाएट' मराठी आवृत्तीचे प्रकाशन.



लिव्ह वेल डाएट
डॉ. सरिता डावरे, संजीव कपूर

डॉ. सरिता डावरे आणि मास्टर शेफ़ संजीव कपूर यांनी लिहिलेल्या 'द लिव्ह वेलडाएट' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन दि. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी .३० वाजता महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे होणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री परेश रावल आणि ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. प्रकाशनानंतर डॉ. डावरे, संजीव कपूर, परेश रावल आणि शंकर महादेवन यांच्याशी गप्पा मारतील अभिनेत्री स्वरूप संपत. वाचकांना देखील डॉ. डावरे आणि संजीव कपूर यांना प्रश्न विचारण्याची संधी यावेळी मिळू शकेल.
'द लिव्ह वेलडाएट' ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. ' लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले  अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी केलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेतसोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनणाऱ्या या पाककृती आहेत. थोडक्यात म्हणजे आपले रोजच्याच जेवणात किंचित बदल करून आपण आपले आरोग्य किती सांभाळू शकतो हे या पाककृतींवरून लक्षात येईल.
हे पुस्तक उत्तम आरोग्य आणि वजन नियोजन यासंदर्भातले योग्य मार्गदर्शक आहे कारण यात टप्प्याटप्प्याने आवृत्त होणारा आणि खात्रीपूर्वक वजन कमी करणारा डाएट प्लान दिला आहे, दिवसाच्या प्रत्येक जेवणासाठी तपशीलवार मेन्यु दिला आहे, लग्नसराई, सहली, पार्ट्या अशा डाएट बिघडवणाऱ्या परिस्थितीत वजन नियंत्रण कसे करावे याविषयीचा सल्ला आहे. अनेकदा चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह अनावर होतो आणि डाएट बिघडते. अशावेळी झालेले नुकसान कसे भरून काढावे हेही या पुस्तकात सांगितले आहे म्हणूनच डाएट करणे म्हणजे शिक्षा असा समज राहत नाही. डाएट  करण्याचा कंटाळा येता ते गंमतीदार होते. एकूणच, या पुस्तकामुळे वजन नियंत्रण होतेच पण खाण्याकडे आणि आपल्या जीवनशैलीकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो.

डॉ. सरिता डावरे यांनी प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा आधुनिक पाश्चात्य वैद्यकीय पद्धतींशी मेळ घालत आरोग्यपूर्ण जगण्यासाठी एक अधिक चांगली उपचारपद्धती शोधली आहे. शारीरिक वेदना, वजन नियंत्रण, खेळाडूंना होणाऱ्या दुखापती आणि जुनार आजारांसाठी अक्युपंक्चर उपचारपद्धतींचा वापर करण्यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे आणि त्याचा फायदा आपल्या रुग्णांना मिळवून दिला आहे. आयुर्वेदातील एम डी परीक्षेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या डॉ सरिता डावरे यांना फेब्रुवारी २०१३ मध्ये मिळालेल्या 'राजस्त्रिया सवित्री अवार्ड'सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मास्टर शेफ़ संजीव कपूर यांचे भारतीय पाकशास्त्रावरचे वर्चस्व वादातीत आहे. त्याचीच झलक म्हणजे 'खाना खजाना' हा अनेक पुरस्कार पटकावलेला लोकप्रिय कुकरी शो, त्यांनी सुरु केलेले 'फूड फूड' हे टीव्ही चानल, भारतात आणि परदेशात लोकप्रिय झालेल्या त्यांच्या उपाहारगृहांच्या तीन शृंखला, त्यांनी सुरु केलेले तयार खाद्यपदार्थ, त्यांना मिळालेले अनेक महत्वाचे पुरस्कार आणि त्यांनी लिहिलेली लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी १४० हून अधिक पाककलेवरची पुस्तके. त्यांच्या पुस्तकांनी असंख्य वाचकांना स्वयंपाकातले कौशल्य आणि त्यातला आनंद मिळवून दिला आहे.

पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ एकत्रितपणे गेली चार वर्षे मुलुंड येथे 'प्रिय रसिक' नावाने तीन दिवसांचा साहित्यिक महोत्सव आयोजित करतात. हे या महोत्सवाचे पाचवे वर्ष. दि. २४, २५ आणि २६ फेब्रुवारी हे तीन दिवस होणार्या या महोत्सवाची सुरुवात डॉ सरिता डावरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाने होणार आहे. 
पॉप्युलर प्रकाशन हि मराठी पुस्तक प्रकाशन क्षेत्रातली एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. १९५२ साली गंगाधर गाडगीळ यांच्या 'कबुतरे' आणि अरविंद गोखले यांच्या 'कमलण' या दोन पुस्तकांनी प्रकाशनाचा श्रीगणेशा करणाऱ्या या संस्थेने गेल्या साठ वर्षांत साहित्य चळवळींच्या विविध अंगांत सहभाग घेतला. विशेषत्वाने नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवप्रवाह पोप्युलच्या माध्यमातून वाचकांसमोर आले. ललित पुस्तकांबरोबरच अललित विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तके पॉप्युलरने प्रकाशित केली आहेत. त्यांपैकीच हे एक पुस्तक.

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा